
प्रथम पर्वातील विजेते सरकार फायटर्स तिसऱ्या पर्वातही मैदान गाजवण्यासाठी सज्ज; कॅप्टन कुमार गायकवाड यांचा आत्मविश्वास!
भादे, ता. खंडाळा : क्रिकेटच्या मैदानावर विजयाची परंपरा निर्माण करणारा आणि पहिल्याच पर्वात विजेतेपदावर नाव कोरणारा सरकार फायटर्स संघ भादे प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर दमदार कामगिरी करण्याचा निर्धार संघाने केला असून यंदाही विजेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भादे प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात विजेतेपद पटकावून आपली ताकद सिद्ध करणाऱ्या सरकार फायटर्स संघाचे मालक खंडाळा पंचायत समितीचे माजी सदस्य तथा खंडाळा तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेचे विद्यमान चेअरमन मा. बाळासाहेब जाधव आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने यंदाच्या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे.
यंदाच्या पर्वात सरकार फायटर्सच्या संघात आकाश साळुंखे, शंभूराज जाधव, अविनाश धायगुडे, स्वप्निल (तात्या) साळुंखे, शुभम गायकवाड, रोहित साळुंखे आणि प्रथमेश गायकवाड या खेळाडूंचा समावेश झाला आहे. नव्या आणि अनुभवी खेळाडूंच्या एकत्रित ताकदीमुळे संघाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अधिक सक्षम झाले असून प्रतिस्पर्धी संघांसमोर तगडे आव्हान उभे करण्याची क्षमता सरकार फायटर्सने निर्माण केली आहे.

“मैदानात कोणताही संघ कमी ताकदीचा नाही. प्रत्येक प्रतिस्पर्ध्याचा आदर राखत पूर्ण क्षमतेने खेळणे हेच आमचे धोरण आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागांत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आमचा संघ सज्ज आहे. संघभावना, जिद्द आणि खिलाडूवृत्तीच्या जोरावर यंदाही विजेतेपद मिळवण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू,” असा विश्वास सरकार फायटर्सचा कर्णधार कुमार गायकवाड याने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
पहिल्या पर्वातील विजेतेपदाचा आत्मविश्वास, नव्या खेळाडूंची ताकद आणि विजयासाठीची प्रचंड जिद्द या जोरावर सरकार फायटर्स यंदाच्या भादे प्रीमियर लीगमध्ये कोणता करिष्मा दाखवणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

